Thursday, January 16, 2020

आमचे वडील

"डॉक्टर  ना?"
"हो!"
"आमचे वडील आलेत तुमच्याकडे दाखवायला."
"हो का?....पाहतो की!"
"नाही ते क्लिनिकमध्ये नाहीत....त्यांना जिना चढून वर येता येत नाही...ते क्लिनिकसमोर पायरीजवळ बसून आहेत."
"तुम्ही कुठं आहात?"
"मी घरी आहे...काही किरकोळ काम आहे.....डॉक्टर, तुम्ही जरा खाली जाऊन बघता प्लिज? वडिलांना खालीच जाऊन तपासा आणि त्यांना तिथंच औषध द्या प्लिज!"
"त्यांचा केसपेपर केलाय?"
"नाही!...मी त्यांच्याकडे पैसे देऊन त्यांना रिक्षातून पाठवलंय. तुमच्या हॉस्पिटल स्टाफला खाली पाठवून तेवढा केस पेपर करून घ्या की!"
"चालेल."
"आणि त्यांची जी काही औषधे असतील ती मेडिकलमधून घेऊन द्या प्लिज."
"चालेल."
"....आणि सगळं झालं की त्यांना एक रिक्षा करून घरी पाठवून द्या."
"नक्की."
"डॉक्टर, तुम्हांला मी एवढी कामं एकाच वेळी सांगितली याबद्दल राग नाही ना आला?"
"बिलकुल नाही!....तुम्ही आयुष्यभर तरूणच राहणार आहात!...तुमच्या वडिलांसारखे म्हातारे होणार नाही आहात!...पण माझं तसं नाही....आणखी काही वर्षांनी मीही म्हातारा होणार आहे!....मला या गोष्टीची जाणीव आहे म्हणून मी मला अशा गोष्टीचा मुळीच राग येत नाही....मला फक्त तुमच्यासारख्या मुलांचा हेवा वाटतो की जी कधीच वृद्ध होणार नसतात आणि मला त्या बापांच्याबद्दल सहानुभूती वाटते की त्यांना तुमच्यासारखी मुले मिळाली!"
    मग काय?...एक सेकंदात फोन कट आणि दहा मिनिटांत तो जंटलमन क्लिनिकमध्ये हजर....    ☺😊 

  डॉक्टर

No comments: