Sunday, May 30, 2010

अशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी

अशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी

जीव घेत घेत माझा कोण उभे माझ्या दारी

किती जपून ठेवले गुज ओठावर आले

साऱ्य़ा सयीचे वऱ्हाड मेघा का रे बोलवले ?


दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना

मनातली हुरहुर जशी मनात मावेना

माझ्या मनात मांडव असा सहजी पडेना

आर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना


आता तरी दे ना दे ना मनातले आवताण

मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान

आता येथोनीच थांब नको मनभर होऊ

माझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ


हाकेतुन तरी काय ? स्वर पाण्याचा पाण्याचा

तुझे आकाश पाण्याचे . . माझा डोळाही पाण्याचा

इथे पाणी तिथे पाणी . . एवढेच ना करणे

उन्हे पडल्यावरती पुन्हा भाजुन निघणे . . .


आता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन

आणि कोसळता सरी आत आत पाझरीन. . .

No comments: