Thursday, May 27, 2010

अता नको नवी पालवी नको हिरवे पान

अता नको नवी पालवी नको हिरवे पान
माणूस म्हणून आयुष्याकडून हरल्याचे भान
त्यापेक्षा मोहातून सोडवून घ्यावा आत्मा
गुंतण्याआधी कोठे जीव ध्यावा परमात्मा

मन गुंतवण्यापेक्षा हात गुंतवणे खरे
ह्रुदय जुळवण्यापेक्षा शब्द जुळवणे बरे
नव्या म्रुगजळांपेक्षा जुनी वाळवंटे खरी
अंधूक सुखापेक्षा स्पष्ट दु:खे बरी

नको नव्या आशा पुढे दारूण निराशा
काहीच नसते शाश्वत, हेही नसते शाश्वत
दु:ख कसे आपले हक्काचे असते
त्याला तरी निदान कवटाळून बसता येते

दैव ही न होते माझे कर्महि न होते
प्राक्तनाचे भोग अन् पाप माथी होते
कुणाकडे आता उ:शाप हे मागायचे
जन्मलो त्याचेहि पश्चात्ताप व्हायचे

No comments: