आयुष्यात प्रत्येक जण प्रेम करत असतो. त्यातील काहीजण बोलून दाखवतात तर काहीजण मनातच ठेवतात. शाळा-महाविद्यालयातील प्रयोगशाळेत विज्ञान विषयाचे आपण विद्यार्थीदशेत अनेक प्रयोग केले असतील किंवा करत असाल किंवा भविष्यात करणार असाल.परंतु, विचार करा जर त्याच प्रयोग शाळेत आपण प्रेमाचा प्रयोग केला तर कसा होईल?
उद्देश- विज्ञानाच्या दृष्टीकोनातून प्रेमाचे अवलोकन करणे.
व्याख्या- प्रेम हे जळत्या सिगारेटसारखे तसेच मेनबत्तीसारखे असून त्याची सुरवात झुरक्यापासून तर शेवट राखेत...
साहित्य- कॉलेजकट्टा, उद्यान, सिनेमा हॉल, लव्हर्सपार्क, हॉटेल, रिक्षा, बस वगैरे...
कृती- जेव्हा आकर्षणाचा किरण एका ठिकाणाहुन (मुलाच्या डोळ्यापासून) दुसर्या ठिकाणी (मुलीच्या डोळ्यापर्यंत) पोहोचतो, तेव्हा एकमेंकांच्या दृष्टीपटलावर चमकदार प्रतीमा तयार होते. तेव्हा दोघांच्या गालावर स्मितहास्यही निर्माण होते. अशा प्रकारे निर्माण झालेल्या स्मितहास्याची भिन्न लिंगाच्या दोन शरीरांमध्ये देवाणघेवाण होते. या क्रियेस प्रेमाची दृढ परावर्तित अभिक्रिया म्हणतात.
अडथळा घटक- समाज, जात, शेजारी, आई, वडील व इतर विघ्नसंतोषी.....
वर्गीकरण- प्रेमाचे दोन प्रकार पडतात.
1) निर्हेतुक प्रेम (प्रामाणिक प्रेम)
2) सहेतुक प्रेम (अप्रामाणिक प्रेम)
प्रेमाचे गुणधर्म -
1) प्रेम हे रंगहीन किंवा क्वचित गुलाबी असून त्याला आल्हाददायक सुगंध असतो.
2) खरे प्रेम माणसाला उत्साही व मुर्ख बनवते.
3) प्रेम हे अत्यंत ज्वालाग्राही आहे.
4) प्रेम हे 'विनाशकाले विपरीत बुध्दी'आहे.
सुत्र-
1) प्रेम + मनुष्य = स्वर्ग
2) मनुष्य + प्रेम + नकार (प्रेयसीचा, प्रियकराचा)= आत्महत्या किंवा निराशा (एकतर्फी)
3) मनुष्य - प्रेम = नर्क
प्रेमाचे उपयोग-
1) अन्नाची मोठ्या प्रमाणात बचत होते, कारण प्रेमात मनुष्याची तहान-भूक हरपते.
2) प्रेमामुळे प्रेयसीचा पैसा वाचतो, तर प्रियकराचा खर्च वाढतो.
3) प्रेमामुळे 'गिफ्टशॉप' तुडुंब चालतात, परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
4) प्रेमामुळे लग्नाची मानसिक तयारी होते, कुणासोबत करण्यासाठी!
No comments:
Post a Comment