Wednesday, March 17, 2010

असाच एक उनाड दिवस

असाच एक उनाड दिवस
एकदा मला जगायचंय
लहान मूल होऊन
खूप खूप मातीत लोळायचंय

मित्रांबरोबर मांडायचाय
तो सारिपाटाचा डाव
तोच रडीचा खेळ खेळून
आणायचाय सवपणाचा आव

झाडावर चढुन
सुरपारंब्या खेळायचंय
सायकल शिकताना
खुपवेळा पडायचंय

सूर्य डोक्यावर येईपर्यंत
असंच वणवण भटकायचंय
भूक लागल्यावर मात्र
घराकडे परतायचंय

आईचं ते रागावनं
पुन्हा एकदा ऐकायचंय
अन् मायेनं भरवलेलं जेवण
पुन्हा एकदा खायचंय

गारा झेलताना
चिंब पावसात भिजायचंय
कितीही सर्दी झाली तरीही
आइस्क्रीम खायचंय

पावसात भिजलो म्हणून
आईचा मार खायचांय
पाठ शेकली ग माझी
पुन्हा आईला सांगायचंय

सन्ध्याकाळी खिडकीपाशी बसून
स्वछन्द आकाश बघायचंय
चांदण्या मोजत मोजत
चंद्राला एकदा मामा म्हणायचंय

झोपताना मात्र आईच्या
कुशीतच झोपायचंय
असाचा एक उनाड दिवस
मला एकदातरी जगायचंय

No comments: