हल्ली खुळ्यागत पुटपुटतंच असतो मी काही
ते सारं मलाही कळतंच असं काही नाही
कविता, गाणी, गझला, कधी श्लोकही
हे सारं वेड्यासारखं काय चाललंय, असं म्हणतेही आई
ज्या दिवसापासून ती मला सोडून गेली
अजून तशीच जपली आहे मी माझी खोली
तिची पत्रं, तिचे फोटो, भेटवस्तू, माझ्या कविता
पहिल्या भेटीतला रुमाल, जाताना विसरलेली ओढणी
तश्याच जपल्या आहेत खुणा, मी कवितेच्या पुस्तकातल्या
ते दिवसही तिथंच थांबलेले, त्या कविताही तिथंच थांबलेल्या
अर्ध्या झोपेत अडलीच एखादी ओळ, तर स्वप्नात अडतोच श्वास
म्हणून उशाशी बाळगतोच मी सारे कवितासंग्रह
हल्ली कितीही जपलं तरी उसवतंच जाते मनाची शिवण
खिळखिळे होतात धागे अन् निखळतातच पाने कवितेची
हल्ली निघतातच खपल्या जुन्या जखमांच्या
आणि जीवनाच्या पानावर सांडतेच शाई
कवितांची वही उघडली की फुटतातच सारे बांध
भिजते कवितांची वही अन् भरतेच खोली अश्रूंनी
भिजत पडल्या प्रश्नांप्रमाणे तरंगत राहते सारे, मी माझी उदासीही
पण फक्त धुतली जाते शाई, कागद होतात कोरे, पण राहतातच ओले
असा गाव वाहून जायला यावेच लागतात अश्रूंचे पूर
असे भिजले मन वाळायला द्यावेच लागते विचारांचे ऊन
No comments:
Post a Comment