Tuesday, March 6, 2012

कालिदास मेघांबरोबर संदेश पाठवीत असे

कालिदास मेघांबरोबर संदेश पाठवीत असे, तर कलादास सुगंधाबरोबर संदेश पाठवतो...प्रेयसीला....हाहाहा...या गीताला सुंदर चाल माझ्या धाकट्या भावाने बांधली आहे...

सुगंधांनो, जा दूर देशी, माझ्या प्रियेच्या घराशी...
तुम्ही घ्या विसावा, कुठे फुलापाशी...!! धृ !!

...हळू पावलाने जा तरी तियेपाशी...
बनुनी खट्याळ, वस्त्रे, ढळवा करी जराशी...
अन जागवा गंध माझा, उघडून प्रेमकोषी ... !! १ !! सुगंधांनो...

करा गुज माझ्या, त्या, लाडक्या प्रियेशी...
पुसा क्षेम सारे, ती किती दु:ख सोशी?...
उलघाल या जीवाची, न्या तिचे अंतराशी.....!! २ !! सुगंधांनो...

करितो प्रणाम दोन्ही, कर जोडूनी तुम्हासी...
माझा निरोप हाची, पोचवा तियेसी ....
तुटताच बंध सारे, येईन भेटण्यासी..........!! ३ !! सुगंधांनो...

मृदू बंधने अशी की, मी तिच्या प्रेमपाशी,
धरी धीर थोडा, परवशता ही जराशी...
मारून टाच अश्वाला, जाऊ सवे दूर देशी....!! ४ !! सुगंधांनो...

आश्वासुनी वदावे की, ज्या ज्या स्थळी तू वससी...
विज्ञान ज्ञान तेथेची, मज तीर्थ काशी...
अन एक थेंब अश्रू , मज पुरे तारण्यासी...!! ५ !! सुगंधांनो...

मासोळी जलाविणा, राहावी तरी कशी...
मृगवृष्टी कधी बा व्हावी, ही प्रतीक्षा चातकासी...
ओळखे गुज सर्वांचे, कलादास या समेशी....!! ६ !! सुगंधांनो...

Monday, March 5, 2012

कागदावर गोळा झाले सये

कागदावर गोळा झाले सये
तुझ्या सहवासातील क्षण
अवतरतात शब्द मग ओले
कोरडे होते आपोआप मन


************************


जे सुचते मनाला बोलून टाकतो मी !
हे दु:ख अंतरीचे मांडून टाकतो मी !

उठतात मानत तेव्हा तरंग भावनांचे
आतुरते लेखणी उतरवून टाकतो मी !

सुटतात सर्प तेव्हा मोकाट कल्पनांचे
लेवून आधार शब्दांचा लिहून टाकतो मी !

माणू कसे मी हे आभार एकांताचे ?
महत्व त्याचे त्याला देऊन टाकतो मी !

करतोय प्रथम लिखाण "कुमार" गजलेचे
रहस्य हे स्वतःचे सांगून टाकतो मी !

Sunday, March 4, 2012

सावरीच्या पिसासारख असत मन

सावरीच्या पिसासारख असत मन
कधी इथे तर कधी तिथे
शोधीत असत आनंदाचे क्षण
सुखाचा कोष विणता
विणता वेदनेच्या जाळ्यात
... अलगद अडकत मन
कधी क्षितिजाला गवसणी
घालत तर कधी आपल्याच
सावल्या गोळा करीत
फिरत असत मन
कितीही पकडून ठेवलं
तरी कधीतरी हरवतच ....मन

बोलावतो तूला मी येवून जा जराशी !

बोलावतो तूला मी येवून जा जराशी !
... हातात हात थोडा देवून जा जराशी !!
...
ठेवून का मला गं तू एकटीच गेली !
आता मला सवेची घेवून जा जराशी !!

ना थांबली कधीही डोळ्यामधील धारा !
हे दोन घोट खारे पेवून जा जराशी !!

मी जेवलो तरिही मी जेवलोच नाही !
ही भाकरी व्यथेची जेवून जा जराशी !!

जे बोलता न आले ते शब्द सूर माझे !
ओठावरी गडे तू ठेवून जा जराशी !!

Saturday, March 3, 2012

एक एक तृणासी सारून

एक एक तृणासी सारून
तुडवितो वाट माळरानी
किती राहिले अजून दूर
सौदामिनी ग सांग पठार तुझे

लाटेवरी रमायचे
लाटेतून पोहायचे
थांग तुझे बेट
पाहाया किती सांभाळायचे
अश्रुचे पूर लोटती
वाहणे नित्य सहोदरी
अश्मावरी पडले जिथे
तिथून एक फुल व्हायचे
खरी ओढ मंद नाही
मला किती मढवायचे
मुखवटयानी सूर सखे
अजून किती दडपायचे
सौदामिनी ग सांग दूर
शोध तुझे किती मी घ्यायचे

किती लांब तू असे
अजून किती तुडवायचे
प्राक्तनी सापळे किती
अजून त्यात बागडायचे
राहिले दूर किती तुझे
आभाळ ते मिळवायचे
सोदामिनी ग सांग दूर
राहिले किती पठार तुझे

राख नाही झोपली
वन्ही पेटला मंद
पेटून उठल्या धुरात
किती तुला बघायचे
ढग होतील कधी त्याचे
आशेवरी मी राहायचे
रक्षण करू किती माझे
भेट तुझी कधी व्हायची
आतल्या गाठी दिप्त त्या
सोडवाया कधी भेटायचे
सौदामिनी ग सांग आता
कसे तुला भेटायचे

Friday, March 2, 2012

आज माझीच कविता मला म्हणाली

आज माझीच कविता मला म्हणाली लिहिले नाहीस मला
मी हि किंचित दचकून विचार केला का सुचले नाही मला
जा साठी लिहते,जा साठी सर्व काही ,तोच माझा सोबत राही
मग मी आज काय लिहू तुला???

झाली थोडी ती हि नाराज ...पडल्या आट्या कपाळी
थोडी चिडली थोडी भांडली ,पण करू शकली नाही काही
समजून घेतले आज कवितेने कि सोबत आहे सखा
कशाला गरज आपली लागती आज हिला ??

मी मग केला थोडा विचार
प्रियकराला मांडायला हाच तर आहे आधार
का करा नाराज
बसले मग लिहायला चार ओळी
यातूनच आले परत प्रियकराच्या जवळी ....

Thursday, March 1, 2012

जरा वेगळे वाटते

जरा वेगळे वाटते

तुझ्या चाहुलीने मनी तेवते रे
मनाला जरा वेगळे वाटते रे

तुझे मस्त रेंगाळणे भोवताली
जरी ग्रिष्म, श्रावण सुखे पाहते रे

समुद्रास भरती फुका, चंद्र गगनी
दुरावा सदाचाच हेलावते रे

जुन्या आठवांची खुशी एवढी की
मनाच्या कपारीत ओलावते रे

जसे एकटेपण छ्ळू लागते मज
तुझी प्रेमपत्रे जुनी चाळते रे

उशा पायथ्याला किती संपदा! पण
खरी चैन आलिंगनी लाभते रे

मशाली जळू दे मला काय त्याचे?
तुझ्या प्रेमज्योतीत तेजाळते रे

मनाची उदासी जरा दूर करण्या
तुझा चेहरा एकटक पाहते रे

जगाशी मला काय? देणे न घेणे
तुला केंद्रबिंदू सदा मानते रे

असा काय "निशिकांत" रडतोस वेड्या?
विझू दे मला मी पुन्हा भेटते रे