जरा वेगळे वाटते
तुझ्या चाहुलीने मनी तेवते रे
मनाला जरा वेगळे वाटते रे
तुझे मस्त रेंगाळणे भोवताली
जरी ग्रिष्म, श्रावण सुखे पाहते रे
समुद्रास भरती फुका, चंद्र गगनी
दुरावा सदाचाच हेलावते रे
जुन्या आठवांची खुशी एवढी की
मनाच्या कपारीत ओलावते रे
जसे एकटेपण छ्ळू लागते मज
तुझी प्रेमपत्रे जुनी चाळते रे
उशा पायथ्याला किती संपदा! पण
खरी चैन आलिंगनी लाभते रे
मशाली जळू दे मला काय त्याचे?
तुझ्या प्रेमज्योतीत तेजाळते रे
मनाची उदासी जरा दूर करण्या
तुझा चेहरा एकटक पाहते रे
जगाशी मला काय? देणे न घेणे
तुला केंद्रबिंदू सदा मानते रे
असा काय "निशिकांत" रडतोस वेड्या?
विझू दे मला मी पुन्हा भेटते रे
No comments:
Post a Comment