Monday, January 9, 2012

विवेक बुद्धी हमखास पडलीये गहाण

विवेक बुद्धी हमखास पडलीये गहाण
मतदार राजाला येईल कधी अक्कल,
चांगल्या वाईटाची पारख कशी संपली
कधी चालवशील मतदानात शक्कल..!!

वाटलं होत पोळलेला जनता जनार्दन
खरंच आशा करतोय उमद्या बदलाची,
नोटेच्या राजकारणात भुलला पुन्हा
निकालात काढली प्रतिमा निकालाची..!!

सवयचं जडलीये तुला पोकळ चर्चांची
अत्याचारानंतर चालतं मंथनांचं गुऱ्हाळ,
अमुक-तमुक पर्याय सुचतात क्षणभर
पण शेवटाला वाटतो सत्ताधारीचं रसाळ..!!

पायावर कुऱ्हाड मारत आलास आजवर
वेळ आणलीस रक्तबंबाळ पाय तुटायची,
आंधळा विश्वास सोड रे मतदार राजा
जन्माची लत ह्यांना गरिबाला लुटायची..!!

सत्ताबदल हा जरी नसला उपाय जालीम
ज्याची त्याला जागा दाखवायलाचं हवी,
निस्वार्थी कार्यक्षमतेचा व्हावा उदो उदो
धडा घेईल यातूनचं राजकारण(णी) भावी..!!

तुझ्या पटातला मतदानाचा हुकमी एक्का
शेवटचीचं समजून खेळ आता पुढची चाल,
अजूनही जाणतेपणाने वागला नाहीस तर
देशालाही विकतील हे लोकशाहीचे दलाल..!!

No comments: